Tuesday, December 14, 2010

रेसम फ़िरिरी ... My heart is fluttering like silk in the wind ...

डलहौसी .... डिसेंबर २००९, हा ट्रेक केल्यानंतर आमच्या ग्रुपमधल्या लोकांना एक उत्साहाची संचारीच भरली, आणि त्यातूनच दार्जिलिंग, मिझोराम की पुन्हा एकदा डलहौसी असे वारे सुटायला लागले.पण त्या वार्‍याला दिशा मिळाली ती कुंदनच्या उत्साहीपणा मुळे !!
कोण येणार आणि कोण नाही अश्या बेरजा वजाबाक्या करत करत बाकी उरलेल्या लोकांनी गणितं मांडायला सुरवात केली. सतिश आणि मी ट्रेक प्लॅनिंग मध्ये स्वपुढाकार घेऊन ट्रेकचे रजिस्ट्रेशन, ट्रेन बुकिंग करायला सुरवात केली.पहिल्यांदा गणित चुकले ते आमित-अपर्णा आणि माझ्या सोईस्कर तारीखांवरून. काही केल्या ते न सुटल्याकारणाने शेवटी आम्ही आपली वेगवेगळी उत्तरं मांडली . आमचा problem हा होता की कोणालाच या ट्रेकची संधी गमवायची नव्हती.

१२ नोव्हेंबर २०१०, दुपारी ३.०० वाजता
एक वेगळा अनुभव, अजून एक हिमालयीन ट्रेक, उत्सुकता, थोडी भीती की सगळे व्यवस्थित होईल की नाही .. हे सगळं शिगेला जाऊन पोहचले तो दिवस म्हणजे १२ नोव्हेंबर २०१०. एवढ्या मोठ्या सुट्टीवर जाण्याआधीची ऑफिसमधली कामाची ओढ़ाताण, नुसती धावपळ, ट्रेक सॅक भरण्यातला शेवट्च्या तासातला उडालेला गोंधळ या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतल्याशिवाय ट्रेक पुर्ण झाल्यासारखे वाटत नाही हे खरंच ! आझाद हिंद ट्रेन ८ तास उशीरा असल्यामुळे ही सगळी आवराआवर करायला बोनस वेळ मिळाला होता, त्याचा बहुतेक माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणाला झाला नसेन :) आणि त्यात भर म्हणजे त्याने आमचे पुढचे टाईम-टेबल विशेष असे बिघडत नव्हते.

१२ नोव्हेंबर २०१०, संध्याकाळी ७.३० वाजता
रेणू आणि मी डॉ. ओक कडे मेडिकल सट्रिफिकेट घ्यायला गेलो होतो तेव्हा माझा मोबाईल खणखणला "Satish Kale Calling ..." मला वाटलं, सतिश तयार आहे आणि आपण अजून तयारीच करतोय :( फोन उचल्यानंतर कळले की सतिश पीपी सोबत अजून शॉपिंगच करतोय :) आणि कुंदनच्या बाबांना बरे नसल्यामुळे त्याला आजच नाशिकला जावे लागतेय म्हणून बहुतेक त्याला आज तरी आमच्या सोबत निघता येणार नव्हते :( मागच्या वेळेस (डलहौसी) पण कस्तुरीने सगळे प्लॅन केले होते आणि शेवटच्या दिवशी तीचेच कॅन्सल झाले होते. यावेळेस पण त्याचीच पुनरावृत्ती :( कुंदन कधी तरी आम्हाला जॉइन करेन अशी आशा करत आम्ही फोन ठेवला.

१३ नोव्हेंबर २०१०, पुणे स्टेशन, पहाटे २.०० वाजता
ट्रेनला अजून बर्‍यापैंकी अवकाश असल्यामुळे आमचे इन्ट्रोडक्शन सेशन सुरू झाले. आमचे इन्ट्रोडक्शन म्हणजे फक्त दोन वाक्यात. उदा. मी अजय, टॅलेंटिका मध्ये असतो :) वेटींगरूम मध्ये लोकांचे अफाट सामान पाहून, आपले तर कमीच आहे असं म्हणून मी हुश्श केले.

१३ नोव्हेंबर २०१०, आझाद हिंद एक्सप्रेस, बी-४
आमची आठ पैंकी सहा सीट्स बी ४ तर उरलेली बी ७ मध्ये होती. सगळयांनी एकाच compartment मध्ये रहायचे या आमच्या आग्रहामुळे त्या दिवशी बर्‍याच लोकांना त्रास सहन करावा लागला. राजेश, प्रकाश आणि सतिशने आळीपाळीने ट्रेन मधले क्षण आपल्या कॅमेर्‍यांमधे टिपण्याचे काम अक्षरश: पुणे स्टेशनपासूनच सुरू केले होते. प्रकाश, अजय आणि राजेश सीट्स एक्शेंजच्या कामामध्ये मास्टरी मिळवत होते. अजय आणि माझ्या आईने आमच्या साठी मेथी, गवारीची भाजी, ठेचा, पोळ्या, पालक पुर्‍या, मुगाची धिरडी आणि अजूनही बरेच काही दिले होते, ज्याचा आम्ही ट्रेनच्या प्रवासात पुर्णपणे फडशा पाडला. रेणूने आणि मी जास्त वेळ झोपता यावे म्हणून पुर्ण प्रवासात अप्पर बर्थला प्राधान्य दिले होते :) ट्रेन मध्ये आमचा दिनक्रम म्हणजे उनो, बदाम सत्ती खेळणे, खाणे आणि काहीही विषयांवरून वादावादी यापेक्षा काही वेगळा नव्हता. उनोचा एक ट्रायल गेम खेळल्यानंतर माझ्या, रेणूच्या आणि राजेशच्या डोक्यातून हळूहळू उनोचे एकएक नियम बाहेर पडले. उनो मध्ये जो कोणी हारेल तो आमची काहीतरी करमणूक करेल असे सर्वानुमताने ठरले होते, त्यात पीपीने सांगितलेल्या "काजु किसने खाया, किसमिस किसने खाया" या जोकने आम्हाला खूप हसवले. आइडियावाले "welcome to Orissa/Jharkhand/Kolkata" असे  मेसेज वेळोवेळी करुन आम्ही कुठपर्यंत पोहचलो याची आइडिया करून देत होते. प्रवासाच्या शेवटच्या टप्यात, म्हणजे टाटानगर स्टेशन आल्यानंतर मात्र आता कधी एकदा हावडा येणार असे झाले होते. ट्रेन ८ तास लेट होती या हिशोबाने ती सकाळी ११.५० ला हावडाला पोहचणे अपेक्षित होते पण ती जवळपास दुपारी २.०० च्या सुमारास हावडाला पोहचली आणि आमच्या कलकत्यात फिरण्याच्या, शॉपिंगच्या सगळ्या प्लॅनवर पाणी पडले. बी ४ मध्ये एक ग्रुप फोटो काढून आम्ही आझाद हिंदचा निरोप घेतला.

१४ नोव्हेंबर २०१०, कलकत्ता
बर्‍यापैंकी उकाडा, गर्दीचे उधाण, गडबडाट, बंगाली भाषेतून होणार्‍या अनाउन्समेंट्स; हावडा स्टेशनवर अजून तरी काय वेगळे असणार म्हणा !! आमचे भरगच्च आणि अतिजड सामान कुठेतरी ठेवल्याशिवाय फिरता येणे अशक्यच असल्या कारणाने cloak room ची शोधाशोध सुरू झाली. बर्‍याच चौकशीअंती आम्हाला कळले की आम्ही चितपूर स्टेशनचेच cloak room वापरू शकतो कारण आमची पुढची ट्रेन (गरीब रथ) त्या स्टेशन वरून होती. स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर प्रथम नजरेस पडल्या त्या पिवळ्या धम्म्क टॅक्सीज, हावडा स्टेशनची गडद लाल रंगातली इंग्रजकालीन बांधकाम असलेली इमारत, अतिजुन्या अश्या बसेस आणि समोर भव्य असा हावडा ब्रीज, आम्ही या सर्वांवरून असा निष्कर्ष लावला की कलकत्ता अजून ८० व्या दशकातच आहे. चितपूर साठी टॅक्सी शोधेपर्यंत आम्ही हावडा ब्रीज आणि कलकत्त्याच्या आठवणी आमच्या  कॅमेर्‍यांमधे टिपल्या.

 
टॅक्सीमधून आम्ही हावडा ब्रीज उर्फ रविंद्रनाथ टागोर सेतूला देखील कॅमेर्‍यात बसवण्याचे प्रयत्न केले ते असे ...

हुगळी नदी आणि त्यावर तो पुर्ण, लांब असा असा स्टीलचा हावडा ब्रीजचा फोटो, कुठून घेतलेला असेल असा एक विचार मात्र मनात येऊन गेला. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, हात-रिक्षा, ट्राम, एका चौकातले वाफेवरच्या रेल्वे इंजिनचे मॉडेल, बंगाली चित्रपटांचे होर्डिग्स, अमिताभ आणि अभिषेक बच्चनच्या वेगवेगळ्या जाहिराती आणि महत्त्वाचे म्हणजे बंगाली लोकांचे निरीक्षण करत चितपूर आल्याचे लक्षातच आले नाही. चितपूर स्टेशन मात्र नवीन कलकत्त्याची जाणीव करून देणारे होते. cloak room मध्ये सामान ठेवून आम्ही पोटपूजेसाठी अरसलन नामक रेस्टॉरंट मध्ये पोहचलो. नॉन-वेज कसं झणझणीत आणि लालभडक तर्री असल्याशिवाय मजा येत नाही ...इति अजय, राजेश आणि पीपी, पण त्या दिवशी सगळ्यांनी त्या नॉन-वेज बिर्याणीज गोड मानून खाल्ल्या, हा आता त्या आधीपासूनच गोड होत्या ही गोष्ट मात्र वेगळी :) खुप सगळं खोबरं, आणि तूप ही तिथल्या जेवणाची खासियत, आणि त्याची मजा कदाचित मुठी मुठीने खाल्यानंतरच जास्त येत असावी, पण आमच्या पैंकी कोणी ते आजमावून पाहिले नाही. जेवणानंतर पुष्कळ वेळ आणि व्हिक्टोरिआ पॅलेस तिकडून जवळ होता म्हणून  आम्ही व्हिक्टोरिआ पॅलेसचे दर्शन घेण्यासाठी आमची पावलं त्या दिशेला वळवली. नेमके त्या दिवशी काही कारणांसाठी पॅलेस लवकर बंद झाल्यामुळे आम्ही पॅलेसचे ओझरते दर्शन घेतले :) तिथल्या म्युझिक गार्डन मध्ये एक फेरफटका, आणि तिथल्या चहावर "नुसते गरम लाल रंगाचे पाणी" असा शेरा मारून आम्ही चितपूरला परतलो.
रात्रीचे ९.१५ वाजून गेले तरी ९.४० ची गरीब रथ अजून कशी प्लॅटफॉम वर लागली नाही असा विचार करत रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी पार्सल घेण्यासाठी आम्ही स्टेशनवरच्या हॉटेल मधले मेनू कार्ड चाळत होतो, तेवढ्यात राजेशने खबर आणली की गरीब रथ केव्हाच प्लॅटफॉम नंबर ५ वर आलेली आहे. तेव्हा रथ निघायला फक्त ५-१० मिनिटे शिल्लक होती आणि आम्ही प्लॅटफॉम नंबर १ वर होतो. आमचे सामान उचलून आम्ही जे धावत पळत सुटलो की रथाच्या जी-७ मध्ये आरूढ झाल्यावरच आम्ही श्वास घेतला :) चितपूरचे प्लॅटफॉम भले मोठे असल्यामुळे आम्हाला वेटींग रूमच्या बाहेरून गरीब रथ ट्रेन लागलेली दिसलीच नव्हती, आणि त्यामुळे आमची ही मॅरेथॉन विथ आमचे सगळे सामान तिकडे पार पडली.त्या रात्री मात्र मग दिवाळी फराळावर समाधान मानावे लागले.

१५ नोव्हेंबर २०१०, एनजेपी स्टेशन
एनजेपीला उतरलो, तरी आमचा प्रवास काही संपलेला नव्हता. एनजेपी स्टेशन बर्‍यापैंकी शांत, स्वच्छ होते आणि विशेष म्हणजे तिकडे खुप थंडी पण नव्हती. त्या स्टेशन वर आम्हाला साधारण  एक चाळीशी-पन्नाशी मधला मराठी काका-काकूंचा ग्रुप दिसला. पक्के ट्रेकर्स दिसत होते ते, त्यांच्या दांडग्या उत्साहाला दाद देत, आपल्याला हे दार्जिलिंगला भेटतील की काय असे वाटले. रेल्वे टुरिझम केटरिंगमध्ये डॊसा आणि ऑमलेटचा breakfast झाल्यानंतर दार्जिलिंगला पोहचायचे कसे हा यक्षप्रश्न आमच्या समोर उभा रहिला. कुर्सॉगला जाउन टॉय ट्रेन पकडायची की सिलीगुडी बस स्टॅड वरून बस पकडून दार्जिलिंग गाठायचे ? दोन्ही पर्यायांवर महाचर्चा झाल्यानंतर शेवटी बसने जायचे फायनल झाले. वडाप/टमटम आता तिकडे त्याला काय म्हणतात, तेच लोक जाणे, त्यात बसून आमचा पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला. एवढ्याश्या त्या सिक्स सीटर मध्ये आम्ही आणि आमचे सामान पण दाटीवाटीने बसले होते. तिचा ड्रायव्हर तर अर्धा बाहेरच होता. छोट्या छोट्या गल्ल्या मधून जाताना आजूबाजूच्या गाड्या एवढ्या जवळून जात होत्या की अगदी त्यातल्या माणसांशी हात मिळवता येईल.
शाळेत जाण्यासाठी पिंजर‍या सारख्या हात-रिक्षा पाहून तर बिचार्‍या मुलांवर दयाच आली. राजेशचा कॅमेरा त्या गर्दीत पण सुरुच होता :)





पीपी पुढे ठेवलेल्या तर मी मागे ठेवलेल्या आमच्या सामानावर लक्ष ठेवून होते, काय सांगावे कधी त्यांना टुणकन उडी मारून बाहेर जायची इच्छा झाली तर .. रस्त्यात आम्हाला तेहसिंग रोड, महानंदा नदी आणि अजून पण बरेच काही भेटले. बस स्टॅड वर जाऊन आम्हाला कळले की तिकडे फक्त बस स्टॅड मोठा आहे, बसचे टाईमटेबल आहे, पण बसेस कॅन्सल आहेत; की बसच नाहीच हे बहुतेक फक्त पच्छिम बंगालच्या टुरिझम खात्यालाच महित असावे. भाषेच्या अडचणी मुळे बस वरील न काही वाचता येत होते न तिथल्या लोकांना काही विचारता येत होते. शेवटी एका प्रायव्हेट सुमो मध्ये आमचा दार्जिलिंग प्रवास सुरू झाला.

१५ नोव्हेंबर २०१०, on the way to दार्जिलिंग
सुमो सुरू होताच, एक छोटू(ड्रायव्हरचा असिस्टंट) आणि ड्रायव्हरच्या भावाने सुमो मध्ये एन्ट्री करून आम्हाला सरप्राईज दिले :) पुढच्या १५ मिनिटांतच आम्ही शहरातून बाहेर पडलो बहुतेक, 
कारण लगेच country side roads आणि चहाच्या मळयांमधून आमचा प्रवास सुरू झाला. बाहेरचे दुतर्फा चहाचे मळे, पिवळ्या फुलांनी सजलेले डोंगर, धबधबे, उंचच उंच वळणं घेत जाणारे निमुळते रोड, उंच हिरव्यागार पर्वतरांगा आणि गाडीत सुरू असलेली गाण्यांची मैफील या सगळ्यांचा आनंद घेत आमचा प्रवास सुरू होता. 

                                              

मधून मधून टॉय ट्रेन चा ट्रॅक मात्र आम्हाला खिजवत होता.आमच्या या आनंदात विरजण पडले, ते आमची फरारी पंक्चर झाली तेव्हा !!

गप्पा-टप्पा, फोटोग्राफीचे वेगवेगळे प्रयोग, पेहला नशा, पेहला खुमारचे सामुहिक गायन खास सतिश करता, करुन आम्ही त्या विरजणात साखर घालून ते पिऊन टाकले. आता पुढे आमच्या प्रवासात चहाच्या मळ्यांची जागा हिरवे गालिचे पसरलेल्या आणि धुके पांघरलेल्या डोंगरांनी, शाळेला निघालेली/घरी परतणारी (हा प्रश्न शेवटपर्यंत सुटला नाही !!) गोरखा जमातीची टिप-टॉप गणवेशातली मुलं-मुली आणि विरळ अश्या टुमदार, रंगीबेरंगी घरांनी घेतली होती.
अश्याच एका घराजवळ आमची फरारी पुन्हा एकदा थांबली, टायर मधली हवा चेक करण्यासाठी की भरण्यासाठी ते कदाचित फक्त ड्रायव्हरलाच माहित !! इथेही पुन्हा फोटॊग्राफीचे काही नविन प्रयोग ...

इथल्या लोकांना बहुतेक फुलांची खुपच आवड !! एकही असे घर शोधून मिळणार नाही की ज्यांनी फुलं लावली नाहीत. घराबाहेर एका रांगेत लावलेली वेगवेगळी, विविधरंगी फुलं (मी फुलझाडं म्हणत नाहिये कारण इथे फुलांव्यतिरिक्त फुलझाड सापडणं पण अवघड आहे), छोट्या खिडक्या-दरवाजे, उतरती छप्परं, घराबाहेर कधीही आरवणारे कोंबडे-कोंबड्या, उंच असा गुढीसारखा किंवा ४-५ रंगाच्या पताका असलेला एक झेंडाच म्हणता येईल असे चित्र साधारण प्रत्येक घराचे !! निसर्गाचे हे सौदर्यंरूप बघून मनाची भूक तर आम्ही शमवत होतो, पण पोटाच्या भूकेचे काय ?? पुन्हा एकदा दिवाळी फराळ सुरू झाला. एक एक करत आम्ही ४-५ पदार्थांवर तुटून पडलो. रस्त्यात कुर्सॉग स्टेशनला ड्रायव्हरने आपल्या भावाला अलविदा म्हटले. त्यानंतर मात्र आमच्या फरारीने डायरेक्ट दार्जिलिंगच गाठले.

१५ नोव्हेंबर २०१०, रिपोर्टींग @दार्जिलिंग बेस कॅम्प (२१३४ मी.)
एका रांगेत लागलेले खुप सगळे प्रायव्हेट वेहिकल्स, शाळेच्या मुला-मुलींचे घोळके, रस्त्याच्या कडेला भाजी विकत बसलेले लोक अश्या एका बर्‍याच गर्दीच्या रोडवर आम्ही उतरलो. आम्हाला पोहचायला दुपार झाली होती, हे घड्याळात पाहिले तेव्हा कळले. हवेत एक प्रकारचा गारवा, थंडी, पुसटसं धुकं आपल्या इकडे फक्त पहाटेच अनुभवायला मिळतं ते इथं आम्ही दुपारी अनुभवत होतो. दार्जिलिंगला आम्ही उतरलो, तिकडेच टॉय ट्रेनचे स्टेशन होते. मग काय त्या हिमालयीन हेरिटेज रेल्वे सोबत फोटोसेशन करून आम्ही दुधाची तहान ताकावर भागवली.


पत्ता विचारत विचारत आम्ही दार्जिलिंगच्या गल्ल्या चढत होतो. गर्द हिरव्या डोंगरांवर घरांची नुसती गर्दी असलेले दार्जिंलिंग त्या वेळेस आम्ही पाहिले. YHAI हॉस्टेल पोहचेपर्यंत आम्ही काही बोलण्याच्या अवस्थेत उरलो नव्हतो, त्या चढांनी आम्हांला पुरते दमवले होते. बेस कॅम्पला रिपोर्टींग आणि बाकीच्या फॉरमॅलिटीज पुर्ण केल्यानंतर कळले की आमची राहण्याची सोय एका हॉटेल ब्रॉडवे मध्ये केलेली आहे. YHAI ची पिवळी-निळी टोपी आणि I-Card सोबत आम्हाला G-2 अशी एक नविन ओळख तेव्हाच मिळाली. मग आम्ही
चढलेला चढ उतरून हॉटेलला पोहचलो. या चढ-उतारात आमच्या कॅमेर्‍यांची नाही पण आमची बॅटरी मात्र डाऊन झाली होती.
रूम नं. ९ मधल्या मुली रूमची चावी आपल्या सोबत घेऊन गेल्यामुळे आम्ही सगळे रूम नं. १५ मध्येच पकोडे आणि चहाची वाट बघत बसलो. शिटीचा आवाज ऎकताच डायनिंग रूमकडे धाव घेतली. पकोडे आणि कोरा चहा यावर आम्ही अक्षरश: तुटून पडलो, की पुढच्या ५ मिनिटांतच अजुन पकोडे आणि चहाची ऑर्डर दिली. पोटपूजा झाल्यानंतर तिथल्या मार्केट मध्ये एक चक्कर मारली, आणि तिकडे सुरू असलेल्या गोरखा विद्यार्थ्यांच्या cultural program ला हजेरी लावली. हॉटेलवर परतलो ते जेवणाच्या वेळेलाच. बटाटा फ्लॉवरची मिक्स भाजी, वांग्याची भाजी, भात-वरण, पापड, गुलाबजाम, सॅलड, चपाती असा त्या रात्रीचा मेनू होता. एव्हाना आमची बाकी लोकांशी नुसतीच तोंडओळख झाली होती. झोपायला म्हणून रूम मध्ये गेलो तर तिकडे एक कोडे आमची वाट बघत होते. रूम मध्ये जागा ६ आणि मुली ७, मग काय, कार्तिक शर्मांना, मिहिरला फोन वर फोन, निकिता-प्रियंकाची समजूत, संजय पवारशी वाद, श्रध्दाची मनधरणी आणि फायनली कोडं सुटलं !! आमच्या सारखंच कोडं पडलेल्या दोन काकांशी तेव्हा आमची ओळख झाली. झोप तर जाम आली होती, पण लुबिनाच्या घोरण्याने आणि इन ऑल अडचणीमुळे निद्रादेवी काय लवकर प्रसन्न झाली नाही त्या रात्री.

१६ नोव्हेंबर २०१०, Acclimatization and Orientation Day
आजचा दिवस YHAI च्या टाईमटेबल नुसार सकाळी ६.०० वाजता चहाने सुरू होणार होता, पण माझा आणि रेणूचा तो ६.३० ला मॉर्निग वॉकने सुरू झाला. थोडेसे व्यायाम प्रकार आणि ५ मिनिटांच्या जॉगिंग मधेच आमचे Morning Exercise चे सेशन संपले. G-2 मधे टोटल ४३ जण होते, त्यात फक्त ९ मुली. Exercise नंतर होते चना-बदाम, आणि G-1 ला Tata Bbye. चना-बदाम मध्ये फक्त चनेच असल्यामुळे "बदाम किसने खाया ? त्यातल्या काही चन्यांचे नाव बदाम असेन" अश्या काही PJ चां तिकडे जन्म झाला.
साधारण सकाळी ९.०० वाजता ब्रेकफास्ट उरकून आम्ही Acclimatization वॉक साठी जलपहार रोड कडे कूच केले. समोर संदकफू  धुकयांमधे लपलेले होते. दार्जिंलिंगच्या गल्ल्यांमधून पुढे आमचा रोड मिलिटरी कॅम्प मधून होता, तेव्हा सगळ्यांचे कॅमेरे आत गेले. आमच्या सोबत असलेले YHAI चे कॅम्प लीडर आम्हांला शक्य तेवढी माहिती देत होते. शेवाळलेली उंचच उंच पाईन वृक्ष, दर्‍या, दर्‍यांमधल्या पायवाट, तिथली सुंदर अशी घरं, वेगवेगळी पानं, फुलं, दार्जिंलिंगची वस्ती, सेंट पॉल स्कूल, कुठल्या तरी राजाचा निळा गोल घुमट असलेला राजवाडा, आर्मीचा शूट आउट एरिआ, आर्मीचे ग्राऊंड, हवे तेवढे आणि हवा तेवढा वेळ ब्रेक हे सगळं कॅमेर्‍यांमधे टिपत आणि मनामध्ये साठवत आम्ही एका जापनीज बौध्द मंदिरात पोहचलो.

छोटेसे दुमजली असे पांढर्‍या रंगातले जापनीज कलाकुसरीचे, प्रवेशद्वाराजवळच सुबक अश्या व्याघ्र मुर्ती, आपल्याकडे दीपमाळ असते तसे प्रवेशद्वारा समोर दगडी खांब आणि त्यावर जापनीज लिपी मध्ये सोनेरी रंगाने काहीतरी कोरलेले असे ते बौध्द मंदिर !!

आत शिरल्यानंतर समोर लगेचच बुध्दांची ध्यान अवस्थेतली, काळ्या रंगाची मुर्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. दुसर्‍या मजल्यावर त्यांचे प्रार्थना मंदीर होते, प्रार्थना करताना फोटो काढण्यास सक्त मनाई होती. तिथल्या प्रार्थनेचे स्वरूप काही वेगळेच होते. तिथे ढोल सारखे पण आकाराने लहान, अंडाकृती आकाराचे छोटे वाद्य होते आणि ते एका विशिष्ट तालातच वाजवायचे होते. तिथले सेवक ते वाजवताना काही शांती मंत्राचा जप करत होते, एकूणच त्याने तिथल्या वातावरणात एक शुध्दता, शांतता निर्माण होत होती. हिरोशिमा आणि नागासाकी नंतर शांततेच्या प्रचारासाठी या मंदिराची स्थापना झाल्याचे तिथे नमूद केले होते. बौध्द धर्मात प्राण्यांचे असलेले स्थान, आणि त्याची माहिती करून देणारी, मंदिराचा इतिहास सांगणारी बरीच पत्रके प्रार्थना मंदीराच्या बाहेर लावलेली होती.


मंदीराच्या जवळच उंच गोलाकार असे शांती स्तूप म्हणजेच पीस पागोडा होते.त्या स्तूपचे ते चित्र मनात घर करून जाणारे होते. उंच उंच पाइन वृक्षांनी, ढगांनी आणि धुक्याने त्याला संपूर्ण वेढलेले होते.






बुध्दाच्या भव्य अश्या ५ महत्वाच्या सोनेरी रंगाच्या मुद्रा त्या स्तूपामध्ये कोरलेल्या होत्या.




स्तूपाभोवती प्रदक्षिणा मारून आम्ही बेस कॅम्प कडे निघालो.सूप घेतल्यानंतर, आम्ही सगळेजण ताडकन रूम मध्ये पळालो, ते आंघोळीला नंबर लावण्यासाठी :) आंघोळीनंतर दुपारी १.०० वाजता जेवण, मग आणलेल्या सामानातून ट्रेकला नेण्याचे आणि बेस कॅम्पला ठेवायचे अशी सामानाची वर्गणी करून आम्ही मार्केट मध्ये भटकलो. त्या दिवशी दूध असलेल्या चहा साठी मात्र आम्ही खुप भटकलो :) सतिश आणि बाकीच्या मुलांच्या टोळीने तिथल्या एका शॉल विकणार्‍या मुलीशी बार्गेनिंग वरून हुज्ज्त घालून महाराष्ट्रियन लोकांना कंजूश हे विशेषण मिळवून दिले :) हॉटेलला परतलो ते चहा आणि पकोड्यांची वेळ झाली तेव्हाच !! हॉटेल मधून आमचे बेस कॅम्पला ठेवण्याचे सामान घेऊन आम्ही Orientation साठी बेस कॅम्पला निघालो. संध्याकाळचे फक्त ६.३० वाजले यावर विश्वास बसत नव्हता, कारण रस्त्‍यावर बर्‍यापैंकी अंधार झालेला होता. हॉटेल ते बेस कॅम्प आणि बेस कॅम्प ते हॉटेल हा चढ उतार करून आम्ही ट्रेक करता पुरते तयार होत होतो. सामानातील दिवाळीचा फराळ ट्रेकवरून येईपर्यंत आमच्यासाठी थोडा तरी उरावा अशी अपेक्षा करत आम्ही सामान बेस कॅम्पच्या त्या गोदामात ठेवले. Orientation प्रोग्रामला self introduction ने सुरवात झाली. त्या वेळेस एवढ्या सगळ्या लोकांची नावं लक्षात येणे तसे थोडे अवघड, पण G-2 मध्ये ग्रुप पडले ते तिकडेच. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आणि गुज्जू भाई हे मोठे ग्रुप होते. आणि बाकीच्या काकांचा आणि उरलेल्या लोकांचे आपले आपले वेगळे ग्रुप होते. तेजस-नेहाला YHAI सोबतच्या अनुभवामुळे ग्रुप लीडर आणि Environment Leader तर सतिशला ह्याच ट्रेकचा अनुभव असल्यामुळे डेप्युटी लीड करण्यात आले. श्री. स्तिमित श्रीमणी यांनी त्यानंतर आमच्या ५ दिवसांच्या ट्रेकची आम्हांला सगळी माहिती दिली. आमचे प्रत्येक ठिकाणचे बेस कॅम्प, तिथले लीडर्स, लंच साठीची ठिकाणं, किती कि.मी. चढ, उतार, कुठले प्राणी आम्हाला भेटू शकतात अशी सगळी माहिती आम्ही जमेल तितकी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. स्तिमित यांनी त्या वेळेस आमची ट्रेक करता मानसिक तयारी करून घेतली असे म्हटले तर त्यात काही चूक होणार नाही. हॉटेलला परतून जेवण करून शक्य तितक्या लवकर झोपायचे होते, उद्या YHAI चे टाईमटेबल पाळायचे असे ठरवले होते. आज तरी छान झोप लागावी म्हणून मी आज शाईना जवळ झोपले, काल पेक्षा काही वेगळा फरक जाणवला नाही हे गोष्ट मात्र वेगळी :)


१७ नोव्हेंबर २०१०, तुमलिंग, तोंगलू ट्रेक (२९०० मी.) - ७ कि.मी.
सकाळी ६.०० वाजता: रेणू आणि मी ट्रेक साठी एकदम सेट, सतिश आणि गॅंग पुढच्या ५-१० मिनिटांत डाइनिंग रूम मध्ये चहा साठी पोहचले. तेव्हा तरी गरम असलेले पाणी आम्ही ट्रेक साठी बॉटल्स मधे भरून घेतले. आपण तर शक्य तितके कमी सामान घेण्याचा प्रयत्न केलेला असताना, गोवा ग्रुपने त्या रंगीबेरंगी छ्त्र्या सोबत का घेतल्या असाव्यात याचे नवल वाटले. चहा घेऊन आम्ही हॉटेल वरून बेस कॅम्प साठी निघालो, आनंद याही गोष्टीचा होता की हा चढ आता आम्ही शेवटचा चढत होतो :) जाम ब्रेड, ब्रेड बटर, अंडी, चहा आणि चना-बदाम (फक्त चनेच !!) बेस कॅम्प वर आमची वाट बघत होते. हजेरीच्या वेळेस बर्‍याच लोकांची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यात फक्त तेजस, प्रमोद जोशी, योगेस, अब्बास भाई, श्री. साने, कार्तिक अशी नावं सोप्पी वाटली. मुलींची नावं लक्षात ठेवणं थोडं सोप्पं होतं, इनमिन ९ मुली, मग काय अवघड !! राष्ट्रगीत आणि हजेरी झाल्यानंतर श्री. स्तिमित यांनी आम्हांला हिरवा झेंडा दाखवला. G-3 च्या YHAI स्टाइलमधल्या टाळ्यांच्या गजरात आम्ही सुमो मध्ये जाउन बसलो. मनेभंजनवरून पॅक लंच घेऊन धोत्रे पर्यंत आम्ही सुमोने जाणार होतो आणि तिकडून आमचा ट्रेक सुरू होणार होता.तो प्रवास साधारण २-३ तासांचा होता. सगळ्या मुली आणि कॅम्प लीडर असे आम्ही एका सुमोत होतो. सुमो सुरू होताच पुढच्या ५-१० मिनिटांतच त्या ड्रायव्हरने आम्ही सगळे कुठून आलो आहोत असा प्रश्न केला. आणि त्यानंतर सुमो सोबत त्यांच्या ज्या गप्पा सुरू झाल्या त्या धोत्रेला सुमोसोबतच थांबल्या. शेर्पा पेहसिंग (एक्स आर्मी मॅन) नाव असलेल्या त्या ड्रायव्हरबद्दल आत्ता मला किती लिहू आणि किती नाही असे झाले आहे. त्यांनी शेर्पा तेहसिंगचे घर, त्यांचे किस्से, घूम रेल्वे स्टेशन(भारतातील सर्वांत उंचावर असलेले रेल्वे स्टेशन), दार्जिंलिंग आणि तिथल्या चहाचा इतिहास, तिथले प्राणी, फुलं, पक्षी, कारगिलचे त्यांचे किस्से आणि अजूनही बरंच काही सांगून आमच्या ज्ञानात भर पाडली. "जो सो गया समझो खो गया, जो नही सोया वो मेरे पीछे भागा" असं म्हणत ते आम्हांला जागं ठेवण्यात यशस्वी झाले होते. २२ जन्मों के बाद हमें मनुष्य जन्म मिलता हैं, तो इसका एक पल भी गवाना नही चाहिये, असे विचार असणारे शेर्पा पेहसिंग यांची दैंनदिनी तर खूप काही शिकण्यासारखी होती. मनीरंजनला सिंगालिया नॅशनल पार्क चे कॅमेरेचे पासेस आणि पॅक लंच घेऊन आम्ही साधारण सकाळचे ११.३० ला धोत्रेला पोहचलो. तिकडे पोहचताच पुन्हा एकदा हेड काउन्ट झाला. कुंदन(गाईड) आणि पेमा(पोर्टर) हे आमच्या सोबत असणार होते. कोणीही कुंदनच्या पुढे जायचे नाही आणि पेमाच्या मागे रहायचे नाही, तेजसने पुढे तर सतिशने मागे रहायचे असेही तेव्हाच ठरले.
श्री. स्तिमित यांनी आम्हांला ट्रेक करता शुभेच्छा दिल्या आणि फायनली आमचा ५ दिवसांचा संदकफू-गुरदम हिमालयीन ट्रेक सुरू झाला.










धुक्यात हरवलेल्या, त्या गावातून जंगलाकडे जाणार्‍या पायवाटांवरून आम्ही चालायला सुरवात केली. धुक्यामुळे त्या वाटा अजूनही साखरझोपेत आहेत असे वाटत होते. चालताना होणार्‍या वाटांवरच्या पालापाचोळ्याच्या आणि आमच्या आवाजाने आम्ही त्यांना जागं करत होतो. उतारावर दिसणार्‍या धुक्यातल्या पाइन वृक्षांच्या रांगा आणि कच्ची घरं आम्हाला साथ देत होते,


प्रत्येक वळणावर आम्हाला नवीन रांगा, नवीन
घरं दिसत होती. साधारण एखादा कि.मी. चालल्यावर आमच्या असं लक्षात आलं की आपण थंडीसाठी म्हणून खुपच जास्त कपडे घातलेत, परिणामी जवळपास सगळ्यांनी आपले स्वेटर/जॅकेट/कानटोप्या यांना सॅकचा रस्ता दाखवला. जसे जसे आम्ही पुढे जात होतो तसेतसे जंगळ थोडे विरळ आणि पायवाटा दगडी होत चालल्या होत्या. मध्ये मध्ये थोडी विश्रांती घेत आमची पावलं चालत होती. कुंदन जवळच्या बर्फाच्छादित तुमलिंगचे फोटो पाहून फोटोचा फोटो काढायचा देखील मोह काही आवरला नाही :) रस्त्यात लागणारे शॉटकट्स महेश आणि पीपीला जास्तच खुणावत होते. अश्याच एका शॉटकट वरून महेशने चालायला(चढायला ;)) सुरवात केली आणि मग आम्ही पण, काही अंतर वाचेल तेवढचं; म्हणून त्याच्या मागे सुरवात केली आणि नंतर कळलं की त्या शॉटकटवर वाट अशी नाहीच आहे, मग काय तो चढ नुसता चढता चढता नाकी नऊ आले. आम्हीच काय पण गोवा ग्रुपला पण हा मोह जास्तच महागात पडला. YHAI ने दिलेले ड्रायफ्रुट्स आणि Glucon-D घेतल्याशिवाय आमचे पाय पुढे चालणारच नव्हते. धुक्यातले हिरवे डोंगर नजरेखाली घालत, कि.मी.चा काउन्टर कमी कमी करत करत आम्ही चालतच होतो. आजचा ट्रेक ७ कि.मी.चा होता. सुरवातीचे ४ कि.मी. मग कुरणं लागतील तिथे जेवण आणि नंतर उरलेले ३ कि.मी. सतिश, पुढे गेल्यावर चहा मिळतो, नूडल्स मिळतात असे सांगून सगळ्यांना चालत रहायला भाग पाडत होता.
हळूहळू मग दगडी वाटेच्या शेवटाला हिरव्या रंगाची कमान दिसायला लागली, तीच आपली लंच साठीची जागा आहे हे कळल्यावर अचानक आमच्या गाडया ५ व्या गीअर मध्येच.
 तोंगलू औषधीय वनस्पती संरक्षण केंद्रच्या त्या कमानीतून पुढे दूरवर पिवळसर हिरवे असे माळरान पसरलेले होते. अगदी कवितेतल्या कापूस पिंजल्यासारखे ससे, कोंबड्या, शेळ्या त्या माळरानावर मनसोक्त हिंडत होते आणि आता आम्ही पण :) याआधी मी कॅण्डल लाईट डिनर ऎकले होते पण मला माहित नव्हते की कोल्ड वेव्ह लंच असेही काही असू शकते आणि त्याचाच थ्रिलिंग अनुभव तोंगलूला आम्ही घेतला. निकिताला सहन न होण्यापलीकडे थंडी वाजून आली होती, की ती पुन्हा निघेपर्यंत त्या घरातल्या चुलीसमोरून उठली नाही. सगळे लंच पॉईंटला पोहचेपर्यंत कोणीही तिकडून निघायचे नाही ...इति तेजस(ग्रुप लीडर) मग कॉफी, कबड्डी, फोटोज, गप्पा यात पुढचा अर्धा-एक तास कसा गेला ते कळलंच नाही. शेवटी तिथला वारा आणि थंडी यांच्यापासून वाचण्यासाठी, कुंदनची परमिशन घेऊन आम्ही पुढे चालायला सुरवात केली. गोवा ग्रुप, २-३ काकांचा ग्रुप आणि आम्ही पहिल्या दिवसापासूनच आगेकूच करत होतो.
पुढच्या सरळ, अगदी थोडा चढ-उतार अश्या दगडी वाटेने आम्हाला डायरेक्ट नेपाळ मध्येच पोहचवले. "Welcome to Nepal" असा बोर्ड पाहिला तेव्हा कळले आपला ट्रेक National नसून International आहे :) श्री. गौतम चॅटर्जी(तुमलिंग कॅम्प लीडर) G-2 च्या स्वागतासाठी अगदी तिकडेच थांबले होते.शिखर लॉज(YHAI Tumling Base Camp Site) च्या सर्वेकर्ता नेपाळी शिक्षिका असलेल्या निलू दिदींनी गरम गरम सूपने आमचे स्वागत केले.


तुमलिंग बेस कॅम्प - शिखर लॉज
शिखर लॉजही वेगवेगळ्या अश्या सुंदर फुलांनी सजलेले होते. रूम अलोकेशन झाल्यानंतर आम्ही तयार होऊन चहा आणि पकोड्यांवर ताव मारला, आता आम्हाला YHAI चे टाईमटेबम पुर्ण पाठ झाले होते :) पुढचे १-२ तास शिखर लॉज मध्ये ट्युन न करता एक वेगळेच रेडिओ-स्टेशन सुरू होते, कार्यक्रम सुरू होता "हमारी पसंद" सदाबहार गीतों की मैफील !! गायक-गायिका होते महाराष्ट्र ग्रुप आणि श्रोते होते निलू दिदी, त्यांचा स्टाफ, G-2 चे डायनिंग रूम मध्ये उपस्थित असलेले लोक, इस्राईली ट्रेक ग्रुप आणि एक क्युटसा डॉगी. तुमलिंगचे कॅम्प फायर म्हणजे विकास आणि आब्बास भाईंची Birhday Party, श्री. सानेंचे स्केच, ओरिगामी काकांचा शो, गुज्जु डॉक. चे पीजे, जिग्नेस भाईंचे विनोद, मराठी आणि गोवा ग्रुपचे समुहगायन, आब्बास भाइंचे पच्चीस, गुज्जु अंकलचा बप्पी,किशोर,मुकेशजींचा मिमिक्री शो यांची खिचडी होता. खिचडी नंतर अंडा करी फस्त करून आम्ही झोपी गेलो.
दुसर्‍या दिवशी पहाटे ५.०० वाजता उठून कॅम्प बाहेरच्या टेकडी वर सुर्योदय पहाण्यासाठी जमलो. अर्धा-एक तास झाला तरी क्षितिजावरचे काळे ढग काही केल्या जागेचे हलत नव्हते. आमच्या  आशा मावळल्या पण सुर्याचे दर्शन काही झाले नाही. चहा, ब्रेकफास्ट आणि पॅक लंच मध्ये तिबेटियन ब्रेड, बटाट्याची भाजी, शिरा घेऊन G-2 कालापोखरीसाठी तयार झाली होती, संजय पवार आणि निकिता मात्र केव्हाच दार्जिंलिंग करता निघाले होते. बिचारा पेमा, आज दुसर्‍या कोणाचे तरी सामान उचलणार होता. श्री. गौतम यांच्या शुभेच्छानंतर आमचा ट्रेकचा दुसरा दिवस सुरू झाला. 

१८ नोव्हेंबर २०१०, कालीपोखरी ट्रेक (३१०८ मी.) - १३ कि.मी.
आजचा ट्रेक आम्हाला भारत-नेपाळ सीमेवर १३ कि.मी. चालवणार होता. दोन्ही बाजूंना पिवळसर हिरव्या रंगांचे गवत पसरलेले डोंगर आणि त्यामधून दगडी पायवाटेवरून गाणी गात, ऎकत,शाळेच्या, कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत आम्ही चालत होतो. आजचा ट्रेकचा रस्ता चांगल्या पैंकी विकसित होता. छोट्या छोट्या झुडपांमध्ये खुप क्वचित कधीतरी एखादे असे झाड दिसायचे. अधून-मधून सिंगालिया नॅशनल पार्कचे बोर्ड आम्हांला त्याचे अस्तित्व जाणवून देत होते. तिथल्या जमातींमधे त्यांचे मंत्र लिहलेल्या पताकांना खुप महत्व आहे. प्रत्येक वस्तीच्या, घराच्या बाहेर अश्या पताका लावलेल्या दिसतात. अश्याच एका २-३ घरे असलेल्या वस्ती जवळ आलो तेव्हा तिथे रस्त्याला २ फाटे फुटलेले होते, एक ज्या दिशेने जात होता तिकडे तिरंगा फडकत होता आणि छोटेसे बंकर सारखे काहीतरी दिसत होते तर दुसरा रस्ता सरळ पठारावरून पुढे जात होता, आता कुंदन साठी थांबणे भाग होते. उदरर्निवाहासाठी ट्रेकच्या वाटेवर असणार्‍या घरांमधून लोक नाना वस्तूंची विक्री करत होते. चॉकलेट, गोळ्या घेण्यासाठी म्हणून आम्ही एका घरात शिरलो तर तिथले लोक रेडिओवर जुन्या हिंदी गाण्यांचा आनंद घेत होती. घराच्या बाहेर त्यांनी वेलाला नकली फुलं लावून त्यांच्या फुलांबद्दलच्या वेडाचा उच्चांकच गाठला होता. कुंदनच्या मागोमाग आता आम्ही नेपाळचा रस्ता थरला होता.
नेपाळच्या जौबारी गावात पोहचलो, तेव्हा चॉकलेट सोबत नेपाळच्या चलनाची देखील खरेदी केली. लाकडी घरं, घरांबाहेर हिरवीगार पानं असलेली मुळयांची शेती, नेपाळी पोशाखातली लोकं, प्रहरी चौकी असे साधारण ३०-४० घरांचे गाव आम्ही मागे टाकले.





त्या रस्त्यांवरून ओझी वाहून नेणार्‍या घोड्यांना पाहून उगाचच, आपली सॅक खूपच हलकी असल्याचा भास होत होता. गोवा ग्रुपचा छ्त्री घेण्यामागचा हेतू आत्ता माझ्या लक्षात आला . हवं तेव्हा काठी म्हणून नाही तेव्हा फोटोसेशन साठी. आता त्यांनी एवढी आणलीच होती तर मराठी माणूस कशाला मागे राहणार !!
गैरीबास - भारत-नेपाळ सीमेवरचे एक गाव, दोन डोंगरांना जोडणारी अशी जागा, आमचे पुढचे विश्रांतीचे ठिकाण होते. गैरीबासला इंडियन आर्मीचे सशस्त्र सीमा बलचे कॅम्प आणि थोडीफार वस्ती होती. चालण्याशिवाय शरीराला दुसरा असा कुठला व्यायामच होत नव्हता म्हणून आर्मीच्या जवानांचे बॅडमिंटनचे ग्राऊंड दिसताक्षणीच तिकडे बॅडमिंटन सुरू झाले.  १३ मधले साधारण ९ कि.मी. आम्ही कव्हर केले होते, इथून पुढे कालापोखरी पर्यंत चढ असणार होता. बॅडमिंटनने वॉम अप् झाल्यानंतर आम्ही चढायला सुरवात केली. माझा स्टोलला ही जागा बहुतेक खूप आवडली, त्यामुळे तो इकडेच कुठेतरी राहिला. दूरवर धुक्यातच पताकांची तोरणं दिसायला लागली तेव्हा कुठे जरा बरं वाटलं, कैयाकाटाला जे पोहचलो होतो आम्ही. या वेळेस तिथल्या घरामध्येच जेवायचे असे ठरवल्यामुळे आम्ही आत जाऊन तिबेटियन ब्रेड, बटाट्याची भाजी आणि शिरा संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
गुज्जु ग्रुप पहिल्या दिवसापासूनच खूप मागे पडायचा, मग त्यांची साठी थांबणे फार अवघड व्हायचे, कारण चालले तर ठीक वाटायचे, आणि जरा थांबलो की अंगावर थंडीने नुसते शहारे यायचे. आजही नाईलाजाने आम्ही आणि अजून १-२ ग्रुपने चालायला सुरवात केली. एका वळणावर, आमच्या पुढे असलेले गुज्जू काका आम्हांला वळणानंतरच्या उंचावर गेलेल्या रस्त्यावर दिसले, तिथे पोहचायला एक शॉटकट पण दिसला, मग काय निदान ४०० मी. तरी वाचतील म्हणून तो शॉटकट चढलो तर लक्षात आले की खालची वाट वळून त्या रस्त्याला येतच नाही. सोबत असलेल्या प्रमोद जोशींनी परत खाली उतरून खालच्या वाटेने जायचे ठरवले कारण त्यांचा ग्रुप खालच्या वाटेने बराच पुढे गेलेला होता. आम्हाला कळत नव्हते की आता नक्की कुठली दिशा आम्हांला कुठे घेऊन जाणार, नशीबाने तिकडे भेटलेल्या ३ नेपाळी मुलांना विचारले तेव्हा कळले जो रोड आम्हाला बरोबर वाटत होता, तो आम्हाला एकतर पुन्हा कैयाकाटा नाहीतर काठमांडूच्या घनदाट जंगलामध्ये घेऊन गेला असता !!  वाटेत भेटलेल्या अजून १-२ लोकांना विचारत आम्ही उलट्या दिशेने चालायला सुरवात केली ही आशा ठेवत की खालची वाट कधीतरी या वाटेला जुळेल. तसं पाहिले तर कैयाकाटा ते कालापोखरी अंतर फक्त ३ कि.मी. होते, पण वरची वाट घेतल्यामुळे ते आम्हाला खूपच लांब पडले असं सारखं वाटत होतं.धुक्यामुळे लांबवरची वाट पण स्पष्ट दिसत नव्हती. वस्ती दिसायला लागली तेव्हा कुठे थोडं हायसं वाटले, जवळ गेलो तेव्हा कळले की तो फक्त आर्मीचा कॅम्प होता. पुन्हा एकदा २ रस्ते समोर आले, तेव्हा तिथे भेटलेल्या एका मराठी जवानाने त्यातला कालापोखरीला जाणारा शॉटकट सांगितला ज्याने आम्हांला सुखरूप कालापोखरी जवळ पोहचवले.
या काळे पाणी असलेल्या तळ्याला धार्मिक महत्व असल्याचे त्यावर बांधलेल्या पताकांवरूनच कळत होते. दाट पसरलेल्या धुक्यामुळे पुर्ण असे तळेही दिसत नव्हते. त्या तळ्यात नाणी टाकून मनातली इच्छा पुर्ण होते अशी तिथली अख्यायिका असल्यामुळे नाणी पाण्यात टाकून आम्ही कालापोखरीच्या बेस कॅम्प कडे वळालो.




कालापोखरीला वस्ती अशी दिसतच नव्हती, होते ते फक्त लॉज आणि हॉटेल्स. कॅम्प लीडर श्री. चिराग पारेख आणि बोचरी थंडी आमच्या स्वागतासाठी तयारच होते. सूप घेऊन ट्रेक नंतरची आवराआवरी झाल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे डायनिंग रूम मध्ये जमलो. पकोडे आणि चहा संपवतो नाही तेच सगळीकडे गोंधळ सुरू झाला की काही लोक अजून पोहचले नाहीत, कोण आणि किती याचा शोध त्यानंतर सुरु झाला.शोध सुरू झाला तेवढ्यात कळले की मायकल आणि ओरिगामी काका आत्ता बेस कॅम्पला पोहचतायेत कारण आम्ही घेतलेल्या शॉटकटच्या इथेच ते उलट्या दिशेला गेल्यामुळे परत कैयाकाटाला पोहचले होते. हेडकाउन्ट झाल्यावर कळले की अजूनही २ लोक मिसिंग आहेत आणि ती नक्की कोण हे शोधण्यात साधारण ४५ मिनिटे गेली असावीत. तेव्हा संध्याकाळचे ५.३० झाले असावेत पण बाहेर खुप अंधार आणि धुकं असल्यामुळे पाऊलं पटपट उचलायला हवी होती. सगळ्यांचे विचार घेण्यात, चर्चा करण्यात बराच वेळ घालवल्यानंतर आर्मीच्या वेगवेगळ्या कॅम्प्सला कळवण्यात आले. गाईड, एक लोकल माणूस आणि मिसिंग लोकांच्या ग्रुप (कर्नाटक ग्रुप) मधले लोक एका वेहिकल मधून शोधासाठी गेली. इकडे ना चंद्रप्रकाश ना काही, त्यांच्याकडे टॉर्च तर असेल ना? त्यांना काही झाले तर नसेल ना? काठमांडूच्या जंगलात तर ते भटकत नसतील ना? असे एक ना हजार प्रश्न !! मनात कुठेतरी वाटत होते की ते ठीक असणार, ट्रेकर म्हटल्यावर इतक्या सहजासहजी थोडी ना ते हार मानतील, इतके सगळे असतानाही पहिल्यांदा निगेटिव्हच विचार मनात का येतो? चिंतेत टाकणारी अजून एक बाब होती की ते दोघं तरी सोबत आहेत की नाही हेही कोणाला माहित नव्हते. पुढच्या १ तासानंतर त्यांचा शोध लागला तेव्हा कुठे डायनिंग रूम शांत झाली. अनुभवातून माणूस शिकत जातो असं म्हणतात त्या दिवशी ते दोघं, कॅम्प लीडर, ग्रुप लीडरही काही शिकली असतील कदाचित !!
गरम गरम जेवण आणि त्यानंतर हॉर्लिक्स घेऊन झोपायची वेळ झाली. ट्रेक मध्ये दिवस पहाटे ५.०० ला सुरू होतो; तर रात्री ९.०० ला संपतोदेखील, हीच गोष्ट मला खूप जास्त आवडते. भयानक अश्या थंडीत, बर्फासारख्या पाण्यात आपले ताट आणि मग धुतल्याशिवाय हिमालयीन ट्रेकची पुर्ण मजा घेतल्यासारखे वाटत नाही हे मात्र खरं !! रात्री थंडीमुळे पटकन झोप लागायची नाही. आज तर खूप वेळ झोपच येत नव्हती, उद्या संदकफू साठी आज नीट झोप व्हायलाच हवी होती. थंडीमुळे माझी रजई कोणी ओढून तर घेतली नसावी ना म्हणून उठले तर रजई मस्त पैंकी बेड्च्या खाली जाऊन झोपली होती. दुसर्‍या दिवशी पहाटे ६.०० वाजता तयार होऊन बेस कॅम्प पासून जवळ असलेली गुहा पहायला गेलो.
पताक्यांची तोरणं, झुडपं आणि धुक्यांमागे लपलेली, छोटीशी आणि अगदी निमुळती अशी वाट असलेली ती गुहा !! गुहेत शिवलिंग होते. जमेल तितक्या लोकांनी आत जाऊन दर्शन घेतले. आंघोळीला विश्रांती असल्यामुळे तयार व्हायला वेळ लागायचा नाही, बटाटा आवडत नसतानाही पुरी आणि  कडधान्य मिक्स बटाटयाची भाजी अश्या ब्रेकफास्टला ब्रेक देणे योग्य वाटत नव्हते. नेहमीप्रमाणे हेड काऊन्ट झाल्यानंतर कॅम्प लीडरच्या शुभेच्छा घेऊन आमचा संदकफू ट्रेक सुरू झाला.


१९ नोव्हेंबर २०१०, संदकफू ट्रेक (३६३६ मी.) - ६ कि.मी.
आजचा ट्रेक सगळ्यात कठीण होता कारण आज ६ कि.मी. पुर्ण चढ होता. संदकफू ट्रेकचा रस्ता तर एवढा विकसित आहे की मधून मधून आम्हाला सिमेंटच्या पायर्‍या भेटायच्या. दगडी वाटेचा चढ, पायर्‍यांपेक्षा सोप्पा वाटायचा, पण कधीतरी पायर्‍या, कधीतरी दगडी वाट असे करत आंम्ही चढत होतो. पायर्‍या चढल्या की मात्र मग थोडं थांबल्याशिवाय आणि ग्लुकॉन-डी घेतल्याशिवाय गत्यंतर नसायचे. जसेजसे वर चढत होतो, तसातसा थर्मामीटरचा पारा खाली जातोय असे वाटत होते. धुकयामध्ये आणि आमच्या मध्ये इतकी छान मैत्री जुळली होती की ते आमची साथ काही सोडत नव्हते. पाईनची झाडं, धुक्यातले हिरवेगार डोंगर, निळेभोर आकाश हे सगळं मनामध्ये आणि कॅमेर्‍यांमधे साठवत आम्ही चढत होतो. अधून मधून सुर्य आमच्यासाठी फ़्लॅशचे काम करत होता.मग अगदी त्या सेकंदात फोटो काढायला आम्ही नुसती धावपळ करायचो. 

भीकेभंजन या पॉइझनस व्हॅलीतल्या आमच्या चेक पोस्टला पोहचलो तेव्हा तिथे सगळ्यांसाठी थांबायचे ठरले आणि त्यातून वादही झाले, कारण काही ग्रुप बरेच मागे राहिले होते. शेवटी पेमाला सोबत घेऊन लोकांनी चढायला सुरवात केली.
चढाच्या शेवटला पांढर्‍या रंगातले, निळ्या रंगातली उतरती छपरे असलेले संदकफू बेस कॅम्प धुक्यांमुळे आमच्याशी लपाछपी खेळत होते.








बेस कॅम्पला सुखरूप पोहचलो तेव्हा हा अवघड असलेला ट्रेकही सह्याद्रीतल्या ट्रेक पेक्षा सोप्पा वाटला. एक कारण असे की इथले ट्रेकचे रस्ते भरपूर विकसित, रूंद असे आहेत. सामना करावा लागतो तो फक्त इथल्या थंडीशी. बेस कॅम्प मधल्या गॅलरी मधून खालचा रस्ता आणि चढत येत असलेले ट्रेकर्स पाहून उगाचच स्वत:हाचा अभिमान वाटत होता. दुपारचे जेवण झाल्यावर थोडी विश्रांती आज गरजेची वाटत होती. विश्रांतीपेक्षाही दोन दोन रजया ओढून नुसतं पडण्यातली मजा आज अनुभवयाची होती. संदकफूला वारा आणि थंडीमुळे रूमच्या बाहेर साधं उभं राहणंही नाकातल्या गंगा-जमुनांना आमंत्रण देण्यासारखे होते. संध्याकाळी डायनिंग रूम मध्ये उनो वर उनोचे डाव खेळत आम्ही हरणार्‍यांकडून खूप सगळी चॉकलेट्स खाल्ली :) बेस कॅम्पच्या डायनिंग रूमने आज अंताक्षरी, राजेशचे माउथ ऑरगन, गुज्जु भाईंचा गरभा, कॅम्प लीडरची सामान्यांना न झेपणारी शायरी, उद्यापासून आमच्या सोबत नसणारे ऑरेंज काका, आणि त्यांच्या ग्रुपचे गायन, आब्बास भाईंचा तो लटके झटकेवाला डान्स, नेहाचे पंजाबी गाणं आणि अजूनही बरंच काही पाहिलं. बेस कॅम्पचा किचन स्टाफ अंताक्षरीमधली जुनी हिंदी गाणी खुप मनापासून एन्जॉय करत होती. संदकफूची थंडी हाता-पायांना सुन्न करणारी होती. याची जाणीव प्रकर्षाने तेव्हा झाली जेव्हा आम्ही प्लेट आणि मग धुवायला बाहेर पडलो. आज तर धुक्यामुळे आणि ढगांमुळे समोर कांजनजंगा पर्वतरांगा असल्याचा विश्वासच बसत नव्हता. उद्यातरी सुर्योदय आणि कांजनजंगा पहायला मिळावं अशी आशा करत झोपले, आशेवर तर जग कायम आहे असं म्हणतात ना !!
पहाटे ५.०० वाजताच आम्ही बेस कॅम्पच्या गॅलरी मध्ये सुर्याच्या स्वागतासाठी कॅमेरे घेऊन तयार होतो. 
आम्ही ढगांच्याही वर आहोत हे तेव्हा कळत होतं. पुर्वेकडे काळ्या ढगांची दाट अशी रांग होती, त्यावर छोटीशी अशी लालसर रेघ होती. तर दुसरीकडे अंधूकसे असे पांढर्‍या रंगाचे काहीतरी दिसत होते, सगळे म्हणत होते की तेच कांचनजंगा आहे पण माझा आणि रेणूचा त्यावर विश्वास बसत नव्हता कारण ते खूप जवळ वाटत होते आम्हांला वाटले की ते एखादे लॉज असावे. काळे ढग हळूहळू पुढे सरकत होते आमची त्यांना एकच विनंती होती की प्लीज तुम्ही वर सरकू नका. जोपर्यंत सुर्य वर येणार नव्हता, तोपर्यंत कांजनजंगाही आपले दर्शन देणार नव्हती. सुर्यांने ६ दिवसांपासून कांजनजंगाला संदकफूमध्ये आपले दर्शन दिले नव्हते, असे काय भांडण झाले होते दोघांचे कोणाच ठाऊक !!

आणि तो क्षण आला होता, सुर्याने आपली हार मानून तो जणू काही कांजनजंगाची माफी मागायला आला होता. त्याच्या एकेका किरणांसोबत कांजनजंगा अगदी नटून-थटून बाहेर पडत होती.





    










तिचे ते अप्रतिम सौंदर्य सगळ्यांच भुरळ पाडत होते.बर्फाच्छादित शिखरं, उंचच उंच असलेल्या कांजनजंगेवरून नजरच हटत नव्हती मग सुर्य तरी किती दिवस तिच्यावर नाराज राहणार होता. आम्हांला यातच आनंद होता की त्यांचे भांडण आज मिटले आणि वेस्ट बंगालच्या सर्वात उंच शिखरावरून कांचनजंगाला पाहण्याची आमची प्रबळ इच्छा पुर्ण झाली.

ती पुर्ण कांचनजंगा पर्वतरांग स्लीपिंग बुध्दाचा भास करून देत होती. कांजनजंगाचे आणि तिच्या सोबतचे फोटो काढण्यासाठी आम्ही संदकफूच्या थंडीला सुध्दा न जुमानता गॅलरीतून केव्हाच खाली आलो होतो. त्या हिमालयीन पर्वतरांगेतून लोटसे, माऊन्ट एवरेस्ट, मकलू, थ्री सिस्टर्स, कुंभकर्ण यांना कॅम्प लीडरच्या मदतीने आम्ही शोधले. ब्रेकफ़ास्ट आणि चहा घेऊन आता आम्ही कांजनजंगाचा निरोप घेणार होतो, पण तिथून पाऊलं उचलत नव्हती कारण कुठेतरी आता ट्रेक संपतोय असे वाटायला लागले होते. 

निघताना कांचनजंगावर निळसर अश्या रंगाची छटा पसरलेली होती, ती शांत आणि सुर्याच्या भेटीने समाधानी वाटत होती.







२० नोव्हेंबर २०१०, गुरदम ट्रेक (२९१० मी.) - १४ कि.मी.
आज पेमा ऎवजी आमच्या सोबत पोर्टर म्हणून कोमल होते. आजचे १४ कि.मी. पुर्ण उतार होता. उतरताना आम्ही कांचनजंगाला पाईन झाडांच्या फ्रेम मध्ये बसवून फोटो काढत होतो. जसे जसे आम्ही खाली उतरत होतो कांचनजंगा डोंगरांच्या आड लुप्त होत चालली होती. सगळे जण सुरळीतपणे उतरत असताना अचानक "याक याक" म्हणून कोणीतरी ओरडले. एक जंगली याक झाडांमध्ये उभा होता. भीकेभंजन पासून एक कुत्रा आमच्यासोबत ट्रेक करत होता, तो त्या याक वर जाऊन भुंकताच तो याक एकदम उधळूनच आला, ते पाहून मायकल घाबरून पळतच सुटला. कुंदनने दगड मारताच तो याक तिकडून निघून गेला आणि आम्हीही आवाज न करता तिकडून पळालो.

चढण्यात जी मजा असते ती उतरण्यात कधीच नसते, तो कंटाळा घालवण्यासाठी आज कॅमेरा जरा जास्तच चालत होता.
        
 
धुक्यांची आणि आमची साथ बहुतेक फक्त संदकफू पर्यंतच होती. 
आज केव्हाच आमचे स्वेटर्स, हातमोजे सॅकच्या आत गेले होते. गाण्यांची जागा गालीबच्या शायरींनी आणि चंद्रशेखर गोखल्यांच्या मी माझातल्या चारोळ्यांनी घेतली होती. आजचा उतार आमच्या गुडघ्यांचा आणि पायाच्या अंगठ्यांचा संयम पहात होता. जंगलातली ती पायवाट आम्हाला गुरदम गावात उतरवत होती. जशी जशी गावातली घरं नजरेत यायला लागली तशी वाटेवर रंगीबेरंगी फुलं देखील दिसायला लागली.

गुरदम बेस कॅम्प
  गुरदमच्या बेस कॅम्पला थंडी बरीच कमी जाणवत होती. जेवण करून आम्ही गच्चीवर उनो खेळण्यासाठी जाऊन बसलो, आतापर्य़ंत उनो मध्ये ज्यांनी कोणी चॉकलेट्स दिली नव्हती, आज त्यांना टारगेट केले होते. तरी शेवटपर्यंत सतिश, प्रकाश, महेश आणि मी नॉट आउट राहिलो :)

चहानंतर आमच्यात इतकी एनर्जी आली की त्यानंतर मुंबई की पुणे, लव्ह मॅरेज की अरेंज अश्या वादाच्या मुद्यांवर महाचर्चा सुरू झाली. ती चर्चा एवढी गाजली की आमचा ग्रुप सोडून बाकीचे लोकही त्यांची मतं आमच्यासोबत शेअर करत होती. कॅम्पफायर विसरून सगळे ग्रुप आज गप्पा मारण्यात मग्न झाली होती. ट्रेक मध्ये आज पहिल्यांदा छान झोप लागली ते इथे कमी असलेल्या थंडीमुळे.
आज YHAI च्या टाईमटेबला विसरून, सगळे निवांत असे सुरू होते ट्रेकच्या शेवटच्या दिवसाची ही चाहूल होती. अक्षरश: तळलेल्या आलू पराठयांचा ब्रेकफास्ट केला. निघण्यासाठी भरपूर अवकाश असल्यामुळे  फोटोग्राफीमध्ये मास्टरी मिळवण्याचा प्रयत्न चालू होता.

२१ नोव्हेंबर २०१०, रिंबिक ट्रेक (२२८६ मी.) - १३ कि.मी.
सिरी नदी
आज आम्ही सिरी नदीच्या डाव्या बाजूने उतरत राहणार होतो. जंगलातल्या त्या झाडांझुडपांच्या वाटा आम्ही सिरी नदीच्या सानिध्यात तुडवत होतो. ट्रेकचा शेवटचा दिवस म्हणून पाय आज जड झाले होते. कॅमेर्‍यामधल्या शिल्लक असलेल्या बॅटरीज आम्हांला आज वेगवेगळे कॉमेडी फोटॊज काढायला खुणावत होत्या. सतिशही वेगवेगळे ऍगल्स वापरून फोटोज काढत होता. सगळ्यात मागे राहून, कोमल पोर्टरची साथ आज आम्ही काही सोडत नव्हतो.



सिरिखोलाच्या आधी हिरव्या रंगांची सुंदर अशी घरं असलेल्या एका गल्लीमध्ये आम्हाला कालच्या उनो मध्ये हरलेल्या लोकांकडून चॉकलेटची ट्रीट मिळाली. सिरी नदीवरच्या पताक्यांनी सजवलेल्या लाकडी पूलावर आम्ही खूप वेळ घालवला. आब्बास आणि सतिश गॅंग तर मांड्या घालूनच बसले होते, त्यामुळे तिथून येणार्‍या जाणार्‍या ओझी वाहून नेणार्‍या घोड्यांना तेवढा त्रास झाला असेन. रस्त्यावरच्या फुलझाडांचे निरिक्षण करत, फोटो काढत फायनली दुपारी १२.०० च्या सुमारास आम्ही सिरिखोलाच्या YHAI हॉस्टेलला पोहचलो. त्याची जागा खूप सुंदर होती. सिरी नदी जवळच्या एका सपाट अश्या डोंगरावर लाकडाचे, पत्र्याची उतरती छ्प्परे असलेले ते तीन मजली हॉस्टेल. 
लंचला वेळ असल्यामुळे सगळेजण खाली उतरून त्या पाण्याच्या   आनंद घेत होते. साने काका तिकडे बसून कसलेतरी स्केच करत होते. प्रत्येक ग्रुपने आपल्या साठी बसायला म्हणून एक-एक मोठा दगड शोधला होता.पाण्याचा तो निखळ आवाज कानांना सुमधूर वाटत होता. मायकल, कर्नाटका ग्रुप यांनी ट्रेकचा फ़ीडबॅक फॉम भरायला सुरवात पण केली होती.ट्रेक आता खरच संपत आला होता. शेवटचे काय ते ७ कि.मी. बाकी होते. गरम गरम खिचडी खाल्यानंतर ट्रेकचा शेवटचा टप्पा सुरू झाला होता.
उतारावरची घरं दुरून खूप छोटी छोटी, एका रांगेत जणू काही कवायतीसाठी उभी राहिल्यासारखी वाटत होती.सुरवातीचे ३-४ कि.मी. चालल्यानंतर छोटी छोटी गावं सुरू झाली. कोणी घराबाहेर इलायची सुकवत होते, लहान मुली शाळेला जात होत्या, मुलं फुटबॉल खेळत होती. काही लोक आपल्या घरामधूनच जनरल स्टोअर चालवत होते. काही घरांवर श्रीमंतीची अशी छाया दिसत होती की उत्तम प्रतीच्या लाकडाच्या भिंती, तेवढेच सुंदर रंग, अतिसुंदर पडदे, साजेसे असे फर्निचर आणि घरात एक तरी कांजनजंगाचे पोस्टर !! रस्ते निमुळते असल्यामुळे घरात जाणार्‍या एका नजरेमध्ये सगळं काही दिसत होतं. मध्येच आम्हाला कोमल पोर्टरच्या दिदीचे घर पण लागले, तो ५ मिनिटांसाठी आत जाऊन आपल्या बहिणीला भेटून आला बहुतेक !! इथल्या प्रत्येक घराच्या दरवाजावर नागाची विविध रूपं असलेली चित्र चिकटवलेली होती, म्हणून महेशने त्या गावाला नागालॅंडच करून टाकले. महेशला "Last Trekker" चा किताब मिळवायचा असल्यामुळे तो मुंगीच्या पावलांनी चालण्याचा प्रयत्न करत होता. सतिशने मला पेरू सारखे दिसणारे काकडीच्या वर्गातले एक फळ रस्त्यातल्या वेलावरून अभ्यासासाठी तोडून दिले होते, ते फळ तिकडे देवाला प्रसाद म्हणून पण वाहतात. माझा आभ्यास झाल्यावर त्याचे काय करू हा प्रश्न मला सतावत असताना मला एका घराच्या समोर परडीत हीच फळं ठेवलेली दिसली, मग काय मी लगेच ते तिकडे ठेवून आले, मंजूदेवीचा प्रसाद म्हणून दुसरं काय !! याच रत्यावर सतिशने एका यंत्राचा शोध लावला, आणि रेणूने लगेच त्याचा आभ्यास करून ते यंत्र फक्त आवाज करेल असा रिपोर्ट दिला :) रस्ता काही केल्या संपतच नव्हता, प्रत्येक घरावर आम्ही YHAI चा बोर्ड शोधत होतो, आणि शेवटी एका ठिकाणी गावातली पायवाट संपली, आणि डांबरी रस्ते सुरू झाले, कुंदनने सांगितले की इकडून अजून १ कि.मी. वर शेवटचा बेस कॅम्प आहे. पण तिकडेच आम्ही आमच्या टोप्या उडवत ट्रेक सुखरूपपणे पार केल्याचा आनंद कॅमेर्‍यामध्ये टिपला :) मग काय आम्ही पुढची पाऊलं पटपट उचायला लागलो, रिंबिक हे बर्‍यापैंकी मोठे गाव वाटत होते. बेस कॅम्पला पोहचणारा आमचा शेवटचा ग्रुप होता, आणि खर्‍या अर्थाने आमचा तो हिमालयीन ट्रेक आत्ता संपला होता :( रिंबिकचे  बेस कॅम्प म्हणजे फुलांचे प्रदर्शनच वाटत होते.
 
 आज आम्ही तब्बल ४ दिवसांनंतर आंघोळ करणार होतो, त्यामुळे तो आम्ही एक आनंदसण म्हणूनच साजरा करत होतो. आमचे मोबाईल आज पुन्हा जिवंत झाले होते :( सारखं पकोडे आणि चहाच्या स्नॅक्सला आम्ही कंटाळलो होतो. त्यामुळे आजचा समोसा आणि चहाचा स्नॅक्स आमच्या आनंदात भर घालत होता. G-2 चे शेवटचे कॅम्प फायर माझ्या या पोस्टला नाव देऊन गेले.
कोमल आणि कुंदन यांनी नेपाळी गीत आणि नॄत्य सादर केले, जे संदकफू ट्रेक मध्ये प्रचलित आहे.

रेसम फिरीरी रेसम फिरीरी ...
उडयरा जाउकी डाडम भंजन रेसम फिरीरी ....

My heart is fluttering like silk in the wind ...
I cannot decide whether to fly or sit on the hilltop ...

वॅलेडिक्टरी सेरेमनी मध्ये अब्बास भाई आणि कॅम्प लीडर कडून आम्हांला सर्टिफिकेट्स आणि मेडल्स मिळाली. आता पुढच्या वर्षी अजून नवे दुसरे ट्रेक्स, नवीन अनुभव असा विचार करत कधी झोप लागली ते कळलच नाही. सकाळी उठल्यावर आता कधी एकदा दार्जिंलिंगला पोहचू असे झाले होते. पटापट बेकफास्ट करून आम्ही सुमो मध्ये जाउन बसलो. आधी मनीभंजन, मग धोत्रे करत २२ नोव्हेंबर २०१० च्या सकाळी ११.३० ला आम्ही दार्जिलिंग बेस कॅम्पला पोहचलो.

ट्रेक खूप काही शिकवतो, आपण शिकत जातो.
चढ तर चढायचाच असतो, पण तेवढ्याच खंबीरपणे उतरताही आलं पाहिजे.
कुठल्याही परिस्थितीला घाबरून तर जायचं नसतं, तर ते आव्हान स्वीकारायचं असतं.

ट्रेक आठवणी साठवयाला शिकवतो, ज्या आपल्या मनाला स्पर्श करून जातात, आपण साठवत जातो.
ट्रेक वेगवेगळ्या लोकांना भेटवतो, आपण नातं जुळवत जातो.
ट्रेक निसर्गाच्या सानिध्यात नेतो, आपण त्याच्यावर प्रेम करत जातो.
आयुष्य हे सुंदर आहे, आपण त्याला अजून सुंदर बनवत जातो.

5 comments:

  1. Gud Work Manju...
    Ya blog n snaps through ya trek che anubhav n aathavani kayam rahtil.. :)

    ReplyDelete
  2. Manju, Thanks a ton !
    तू ब्लोग इतका छान लिहिला आहेस कि पुन्हा एकदा ट्रेक केल्याचा आनंद मिळाला.
    प्रत्येक क्षण पुन्हा एकदा अनुभवला.
    Hats off to you.

    ReplyDelete
  3. Amazing Manju :)
    Khoop chan lihila aahes, aamhi nakki kay miss kela te aata kaltay :(

    ReplyDelete
  4. Nice yaar....... You must have worked real hard on it.

    ReplyDelete
  5. मंजु, खूपच छान लिहीलं आहेस...बर्‍याचशा छोट्या-छोट्या गोष्टी खूप लक्षात ठेऊन लिहिल्या आहेत :)
    कांचनजंगा आणि सूर्याचं जे नातं जोडलस ते तर अप्रतिम !!!

    Keep it up !!

    ReplyDelete