Monday, January 25, 2010

सर्वाना सदबुध्दी दे .....

सकाळची वेळ म्हणजे नोकरदारांसाठी घाईची वेळ ... अशीच एक शुक्रवार सकाळची वेळ. ऑफिससाठी आधीच मला उशिर झालेला. घाईतच मी एका ऑटो मधे जाऊन बसले आणि पुढच्या दोन सेकंदाच्या आत माझ्या लक्षात आले की आपण चुकीच्या रिक्षात बसलोय.रिक्षा आणि रिक्षा ड्रायव्हर दोन्हीही वयोमानाने खुप झुकलेले होते, म्हणजे ऑटो दहाच्या स्पीडने जाणार आणि माझी बस चुकणार हे मला उशिरा का होईना कळून चुकले होते. माझे मन मात्र इतके बेफाट सुटले होते की त्याच्या स्पीडची मोजमाप करणेच शक्य नव्हते. मी चालत गेले तरी कदाचित लवकर पोहचेन असा अतिशयोक्ती विचार पण मनात येउन गेला. ऑटो दोन पाउल पुढे जात नाही तेवढ्यात कुठुनतरी "जय जय सतचितस्वरूपा स्वामी गणराया गजानन महाराज की जय" माझ्या कानावर पडले पण त्या रिक्षात म्युझिक प्लेयर असण्याचा प्रश्न मनाने केव्हाच झटकून टाकला होता. तो आवाज चक्क ड्रायव्हरचा होता आणि दोन मिनिटांपूर्वी ऑफिसच्या कामाचे नियोजन करण्यात गुंतलेले मन एका वेगळ्याच रस्त्याला लागले होते.

मळकासा स्वेटर तितकाच मळका शर्ट, कानटोपी पण अशी की त्यातून कान बाहेरच डोकावत होते कपड्यामधून बाहेर जेवढ्या दिसत होत्या त्या फक्त सुरकुत्या असे ते सत्तरी ओलांडलेले आजोबा ड्रायव्हर आणि तेवढीच वयस्कर त्यांची रिक्षा. मोडकळीस आलेले मीटर, फाटलेले सीट कव्हर, ठिकठिकाणी शिवलेले छप्पर एकंदरीत सगळेच परतीच्या वाटेवर ...रोज सकाळी त्यांच्या धंद्याची सुरवात ते अशीच करतात हे मला गप्पांमधून कळले. गजानन महाराज आरती आणि मग वामन पैच्या "हे देवा सर्वाना सदबुध्दी दे, सर्व जगाचे कल्याण कर" या विश्व प्रार्थनेने याची सांगाता झाली. माझ्या दिवसाची सुरवात तर आलेली सर्व ई-पत्र वाचण्याने होते, प्रार्थना आणि मी खुप दुरावलेय आता. कदाचित शाळेसोबत मी प्रार्थनेला पण निरोप दिलाय असे वाटून गेले. प्रार्थना ही देवाचे मन बदलण्यासाठी नसते तर तो एक प्रयत्न असतो, देवाने आपले मन बदलण्यासाठी ... हे मी पूर्णपणे विसरून गेलीये .
किनारा हॉटेल दिसताच रिक्षासोबतच माझ्या मनाला पण ब्रेक लागला आणि तो प्रवाह तिथेच थांबला. आणि हो माझे तर त्या दिवशी कल्याण झालेच, बस जी मिळाली होती मला :)